गोव्यात वाढत्या गुन्ह्यांविरोधात पणजीत महिला काँग्रेसचा मोर्चा…..
गोव्यात दर महिन्याला किमान नऊ बलात्कार प्रकरणे नोंदवली जात असल्याचा दावा

गोव्यात वाढत्या गुन्ह्यांविरोधात पणजीत महिला काँग्रेसचा मोर्चा…..
पणजी : कडक उन्हाचा आणि उष्णतेचा सामना करत गोवा प्रदेश महिला काँग्रेसने शनिवारी येथे आझाद मैदानाकडे निषेध मोर्चा काढत गोव्यात महिलांवर आणि मुलांवर वाढत्या गुन्ह्यांचा निषेध केला.
या मोर्चाचे नेतृत्व अध्यक्षा डॉ. प्रतीक्षा खलप यांनी केले. या मोर्चात महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि नेत्यांसह गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हातात फलक घेऊन महिलांनी घोषणाबाजी केली आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळत असल्याचा आरोप केला. आझाद मैदानापासून काही अंतरावर असलेल्या काँग्रेस भवनाजवळ माध्यमांशी बोलताना डॉ. खलप यांनी गोवा पर्यटनस्थळ म्हणून नव्हे तर गुन्ह्यांसाठी ओळखला जाऊ लागल्याचा आरोप केला. त्यांनी भाजप नेतृत्वावर टीका करत राज्य भाजप अध्यक्ष दामू नाईक यांच्या कुडचडे प्रकरणातील “ढिसाळ भूमिकेवर” निशाणा साधला.
मोर्चा पुढे सरकत असताना महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी सत्ताधारी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करत त्याला “बलात्कारी सरकार” असे संबोधले आणि या प्रकरणात भाजप महिला कार्यकर्त्यांच्या शांततेवर प्रश्न उपस्थित केले. महिलांच्या सुरक्षेत सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही करण्यात आला.मध्यमांशी बोलताना अमित पाटकर यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत गोव्यात दर महिन्याला किमान नऊ बलात्कार प्रकरणे नोंदवली जात असल्याचा दावा केला.
कुडचडे प्रकरणातील मुख्य आरोपीच्या कुटुंबापासून दामू नाईक यांनी अंतर ठेवल्याचा आरोप करत आरोपीचे भाजपशी संबंध असल्याचे पाटकर यांनी सांगितले. या प्रकरणाशी संबंधित १०० पेक्षा अधिक पीडित असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर टीका करत पाटकर यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रशासन कोलमडले असल्याचा आरोप केला. अल्पवयीन मुलांचे शोषण झालेल्या भागांत विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात कुडचडे प्रकरणातील आरोपीचे वडील सुशांत नाईक यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार प्रत्येक शाळेत समुपदेशक नेमण्याची, गोवा राज्य महिला आयोगासाठी अध्यक्षाची तातडीने नियुक्ती करण्याची आणि महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.
महिला काँग्रेसने काही धक्कादायक आकडेवारीही सादर केली. २०२५ मध्ये दररोज एक मूल प्रभावित; २०२५ मधील केवळ नऊ महिन्यांत २६९ प्रकरणे; २०२२ मध्ये बलात्कार पीडितांपैकी ७६ टक्के अल्पवयीन; आणि ९३ टक्के आरोपी पीडितांना परिचित असल्याचे सांगण्यात आले. २०२६ मधील कुडचडे प्रकरणात २५ ते ३० पेक्षा अधिक अल्पवयीनांचे शोषण झाल्याचा आरोपही करण्यात आला.
सादर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये ७५ बलात्कार पीडितांपैकी ५७ अल्पवयीन होते. २०२४ मध्ये गोव्यात १०६ बलात्कार प्रकरणे नोंदली गेली, तर जानेवारी ते सप्टेंबर २०२५ दरम्यान अल्पवयीनांवरील २६९ गुन्हे नोंदवले गेले. महिलांवरील गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ झाली असून २०२० मध्ये २१९, २०२२ मध्ये २८०, २०२३ मध्ये २९० आणि २०२४ मध्ये ३६५ पेक्षा अधिक प्रकरणे नोंदली गेली. २०२५ च्या केवळ सहा महिन्यांत २०६ प्रकरणे नोंदवली गेली असून दररोज जवळपास एक प्रकरण नोंदले जात असल्याचे सांगण्यात आले.
आंदोलनाचा समारोप करत महिला काँग्रेसने गोव्यातील प्रत्येक शाळेत किमान एक प्रशिक्षित समुपदेशक नेमण्याची सक्ती करण्याची मागणी केली. वाढती आकडेवारी ही केवळ संख्या नसून “गंभीर सामाजिक संकट” असल्याचे सांगत तातडीने सरकारी हस्तक्षेपाची गरज असल्याचे महिला काँग्रेस नेत्यांनी अधोरेखित केले.




