Uncategorized

दोडामार्ग रुग्णालयाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट

उपजिल्हा रुग्णालय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दोडामार्ग रुग्णालयाला अचानक भेट

दोडामार्ग रुग्णालयाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट…

दोडामार्ग :- सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दोडामार्ग येथील रुग्णालयाला दिलेल्या अचानक भेटीत आरोग्य यंत्रणेचा कणाच मोडून पडल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले. या पाहणी दौऱ्यात रुग्णालयातील ढिसाळ कारभार, अपुऱ्या सुविधा आणि प्रशासकीय अनास्थेचा पाढाच वाचला गेला असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

कृती समितीने केलेल्या या महत्त्वपूर्ण पाहणीत रुग्णालयातील एकामागून एक गंभीर त्रुटी उघड झाल्या. रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक असलेली एक्स-रे मशीन आणि सोनोग्राफी सेवा नियमित उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दंत चिकित्सालयात उपचारांसाठी लागणाऱ्या किमान साहित्याचाही अभाव असून डायलेसिस सेंटरमधील वैद्यकीय सेवा अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी रखडली आहे. केवळ वैद्यकीय उपकरणेच नव्हे, तर पिण्याच्या पाण्याचा आर.ओ. प्लांटही बंद अवस्थेत असल्याने रुग्णांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पावसाळा नसतानाही छताच्या गळतीमुळे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांची होणारी कोंडी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे.

या भेटीदरम्यान नंदन वेंगुर्लेकर, सुभाष गोवेकर, संजय लाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. रुग्णालयाची ही दुरवस्था पाहून पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे येथील आरोग्य सेवा कोणत्याही क्षणी ठप्प होऊ शकते, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. ‘नावापुरती सेवा आणि प्रत्यक्षात हालअपेष्टा’ अशी या रुग्णालयाची अवस्था झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर कृती समितीने आता प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. दोडामार्ग तालुक्यातील या प्रलंबित समस्यांवर जाब विचारण्यासाठी उद्या, बुधवार दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे. प्रशासनाने या गंभीर तक्रारींची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला असून, आता चेंडू आरोग्य प्रशासनाच्या कोर्टात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!